आजचे स्टार्टअप्स, उद्याचे युनिकॉर्न्स
गेल्या काही वर्षांत स्टार्टअप्स, म्हणजे नव संकल्पनांवर आधारित उद्योगांचं महत्त्व वाढतं आहे. विद्यमान केंद्र सरकारनंही त्यांच्यासाठी योग्य वातावरण निर्माण करण्याचं धोरण अवलंबलं आहे. स्टार्टअप्समधले अनेकजण पहिल्या पिढीतले आणि मराठी कुटुंबातले आहेत. हे चित्र तीस वर्षांपूर्वी अशक्य होतं, कारण त्या काळी फक्त भांडवल असणाऱ्या प्रचलित उद्योगांतल्या व्यक्तीच उद्योजक होत. इतरांनी नोकरी करणं इष्ट हेच त्या काळचे
विद्वान सांगत.
सहा वर्षांपूर्वी स्टार्टअप्सची संख्या फक्त ७३३ होती. भारतीय स्टार्टअप्सची संख्या आता ६१,४०० झाली आहे. ५५५ जिल्ह्यांत एक तरी स्टार्टअप आहेच. २०२१ मध्ये एकाच वर्षात तब्बल ४४ स्टार्टअप्सनी युनिकॉर्न बनण्याचा विक्रम केला आहे. या वर्षात अनेक स्टार्टअप्स आणि युनिकॉर्न्सनी शेअरबाजारात पाऊल ठेवत ‘आयपीओ’मधून जवळ जवळ ९० हजार कोटी रुपयांचं भांडवल उभारलं. या पुस्तकात अशाच अभिनव यशस्वी नवउद्योजकांची माहिती आहे. उद्योगात शिरू पाहणाऱ्या सर्व वयाच्या उद्योजकांना मार्गदर्शन करावं, हाच यामागचा हेतू आहे.